नवी दिल्ली : क्रिकेट असो की निवडणूकांचे निकाल दोन्हींबाबत सट्टा लावला जाणे ही ठरलेली गोष्ट आहे. आज देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर केले जात आहेत. यादरम्यान अनुभव आणि अंदाजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. ब-याचदा सट्टा योग्य ठरतो तर कधीकधी चुक. दरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्याच्या निवडणूक निकालांवर देखील भरभरून सट्टा लावला गेला.
इतकेच नाही तर या राज्यांमध्ये कोण मुख्यमंत्री बनेल हे देखील सट्टा बाजारात आधीच निश्चित झाले होते. ताज्या अपडटनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये भाजपचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रस आघाडीवर आहे. मतमोजणीपूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल असे सांगितले जात होते. तर काही एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजप आणि राजस्थानमध्ये काँग्रसचे सरकार येईल असा अंदाज होता. एक्झिट पोलच्या विरोधात सट्टा बाजारातील अंदाज मात्र खरे ठरले आहेत.
आज तकच्या रिपोर्टनुसार, सट्टा बाजारात आधिपासूनच मध्य प्रदेशात पाचव्यांदा भाजपचे सरकार येईल असे सांगितले जात होते. तसेच भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज देखील व्यक्त होत होता. यासोबतच भाजपला ११५ ते ११७ जागांवर विजय मिळेल असा दावा केला गेला होता. तर काँग्रेसला ११४ ते ११६ जागा मिळतील असे सांगितले जात होते. इतकेच नाही तर शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री बनतील असाही दावा करण्यात आला. मात्र निवडणूकीच्या आधीपासून भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्यांना मुख्यमंत्री बनवेल याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. मात्र निवडणूकीत मिळालेले यश पाहता त्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे सट्टा बाजाराचा अंदाज याबाबतही योग्य ठरण्याची शक्यता आहे.
काय होता अंदाज?
याच प्रकारे फलोदी सट्टा बाजारात राजस्थान मध्ये भाजप सरकार येईल असे सांगितले जात होते. एक्झिट पोलपूर्वी राजस्थान बाबत सट्टा बाजारात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले होते. सट्टा बाजारात पूर्वी भाजपला १२० ते १२२ जागा मिळतील असे सांगण्यात आले, नंतर हा आकडा ११० ते १२२ वर आला. यामध्ये ११० जागांचा भाव १ रुपये सुरू होता. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे या मुख्यमंत्री बनतील याची खात्री व्यक्त करण्यात आली होती. तसेच सट्टा बाजारानुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून वसुंधरा राजेंना प्रोजेक्ट न करणे ही भाजपची चूक होती, वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केले असते तर भाजपला १६० पर्यंत जागा मिळाल्या असत्या असे बोलले जात आहे. सट्टा बाजाराने छत्तीसगड मध्ये भाजप सरकार येईल असा दावा केला होता. यÞानुसार भाजपला ५० ते ५२ जागा मिळतील तर काँग्रेसला ३७ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज लावण्यात आला होता. येथे एकूण ९० जागा आहेत.
फलोदी सट्टा बाजार काय आहे?
क्रिकेट आणि निवडणूकांबद्दल फलोदी सट्टा बाजाराचे आकलन अचूक मानले जाते. फलोदी हा राजस्थान मधील एक जिल्हा आहे. येथे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. येथे लोक निवडणुका, क्रिकेट आणि हवमान यावर सट्टा लावतात. त्यांच्या अचूक अंदाजांमुळे फलोदी सट्टा बाजार नेहमी चर्चेत असतो.
सट्टेबाजीविरोधात देशव्यापी कायदा नाही
महत्वाची बाब म्हणजे, देशात सट्टेबाजीविरोधात देशव्यापी कायदा नाहीये, हा विषय राज्य सरकारांवर सोडण्यात आला आहे. याविरोधात कायदा बनवणे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते. देशातील अनेक राज्यात सट्टेबाजी वर पूर्णपणे बंदी आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. तर काही राज्यात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता आहे. यामध्ये गोवा, सिक्कीमसह काही राज्यांचा समावेश आहे.