25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ‘लाडकी बहीण’ची दलालांकडून आर्थिक लूट

राज्यात ‘लाडकी बहीण’ची दलालांकडून आर्थिक लूट

कागदपत्रांसाठी ८०० ते १००० रुपये दर शासकीय कर्मचारीही मागतायेत पैसे

सोलापूर/अमरावती/पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला अग्रस्थानी ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून कागदपत्रांसाठी राज्यातील ‘लाडकी बहिण’ची दलालांकडून आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर मंगळवार दि. २ जुलैपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी १५ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, सोलापुरातील केंद्रावर एजंटकडून ८०० ते १००० रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे.

अमरावतीतून व्हीडीओ व्हायरल
अमरावतीत एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. अमरावतीतील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेतले जात आहेत. पैसे घेतले जात असल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून राज्य भरामध्ये सर्वच महिला योजनेसाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवा जुळव करत आहेत. परंतु, वरूड तालुक्यात येत असलेल्या सावंगी गावातील तलाठी तुळशिराम कंठाळे हे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक लाभार्थी महिलांकडून ५० रुपये घेत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

सोलापुरात महा-ई सेवा केंद्रावर १००० रुपये दर
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांची सोलापूरच्या सेतू केंद्रवर तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला मिळवण्यासाठी सेतू केंद्रावर तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दाखला मिळवण्यासाठी महा-ई सेवा केंद्रावर एजंटकडून तब्बल ८०० ते १००० रुपये घेतले जात असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सेतू केंद्रावर जास्त गर्दी होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

नोंदणीची अंतिम तारीख काढून टाका : काँग्रेस
योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ जुलै निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यांतील नोंदणी केंद्रांमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी होईल, एवढी मोठी गर्दी दिसत आहे. आषाढी एकादशी १७ तारखेला आहे. त्यामुळे वारीतील महिलांना १५ तारखेपर्यंत अर्ज भरणे शक्य नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे ती, योग्य नाही. ही योजना सर्वांसाठी खुली असावी अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

गर्दी वाढल्याने महिलांना भोवळ
काही ठिकाणी तर उन्हात उभे राहून महिलांना भोवळ येण्याची प्रकरणेही झालीत. त्यासोबतच पंढरीची वारी सुरू झाली असून गावागावांतून पालख्यांनी प्रस्थान केले आहे. राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुरात दाखल होत असतात. त्यातील निम्या महिला असतात.

दलालांचा सुळसुळाट
लाडकी बहीण योजनेमध्ये २१ वर्षांवरील अविवाहित महिलांना वगळलेले आहे. त्यांचा दोष काय? एखाद्या महिलेने जर ठरवले असेल की, लग्न करायचे नाही. मग तिला ही मदत का मिळणार नाही? तसेच, ६० वर्षांवरील महिलांना जर कोणीही सांभाळणारें नसेल, तर त्यांनाही या योजनेतून वगळणे चुकीचे आहे. त्यामुळे नोंदणीसाठीची अंतिम तारीख काढून टाकावी. आज नोंदणी केंद्राबाहेर एजंट्सचा सुळसुळाट झाला आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR