गंगाखेड : एकीकडे दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतक-यांच्या नशिबी गारपिटीसह अवकाळीचा फटका बसला आहे. त्यात काही मंडळांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील चार मंडळांना वगळण्यात आले आहे. त्याही मंडळांचा दुष्काळग्रस्त यादीत नव्याने समावेश करावा, अशी मागणी आ.डॉ.गुट्टे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लावून धरली.
परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, त्यामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी, बनवस, रावराजूर आणि कावलगाव या मंडळांना का वगळण्यात आले आहे? हा प्रश्न विचारून असा दुजाभाव टाळा असा सल्ला आ.डॉ.गुट्टे यांनी सरकारला दिला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे.
जिल्ह्यातील ५२ पैकी २३ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, काढणीला आलेल्या पिकांचा चिखल झाला होता. फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. जवळपास ८ हजार ५०० हेक्टर तूर आणि कापूस पिक उध्वस्त झाले आहे. ६ हजार हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांच्या घराचीही पडझड होवून काहींचे पत्रे सुध्दा उडाले आहेत. त्याचे पंचनामे झाले आहेत. तरीही नुकसानग्रस्त शेतक-यांना व नागरिकांना अजून कसलीही मदत झाली नाही. त्यामुळे तातडीने मदत करावी, अशी मागणी आ.डॉ.गुट्टे यांनी केली आहे.
आ. डॉ. गुट्टे चौकट मोडून काम करणारे लोकप्रतिनिधी
राज्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने पहिल्या यादीत परभणी जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश केला नव्हता. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यात संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. अशा सर्वसमावेशक भूमिकांमुळे मतदारसंघाची चौकट मोडून काम करणारे संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आ.डॉ.गुट्टे यांची अवघ्या जिल्ह्यात ओळख आहे.