28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषअविश्वसनीय मॅक्सवेल

अविश्वसनीय मॅक्सवेल

क्रिकेटच्या रणांगणात अनेक रथीमहारथींनी आपल्या झुंझार खेळीने यशश्री खेचून आणली आहे. पण यातील काही खेळाडूंची कामगिरी ही चिरकाळ स्मरणात राहणारी ठरली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडफदार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने काढलेल्या नाबाद २०१ धावांचा उल्लेख ‘न भूतो…न भविष्यति’ असाच करावा लागेल. पायात वेदना होत असताना, संघातील बिनीचे फलंदाज तंबूत परतलेले असताना, समोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान असताना मॅक्सवेल ज्याप्रकारे खेळला त्याला तोड नाही! त्यामुळेच त्याच्या आत्मविश्वासाला, झुंझारपणाला आणि विजीगिषुवृत्तीला जगभरातील क्रिकेटरसिकांनी सलाम ठोकला !

कदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार खेळीची आठवण क्रिकेटच्या इतिहास-वर्तमान आणि भविष्यात सदैव राहील. ‘न भूतो न भविष्यति’ अशी खेळी करणा-या मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या पारड्यात गेलेला सामना अक्षरश: खेचून आणला. २०१ धावांची नाबाद फलंदाजी करताना त्याने ऐतिहासिक खेळी केली. या खेळीने प्रभावित झालेला भारताचा फलंदाज विराट कोहली म्हणतो, ‘सिर्फ आप ही ऐसा कर सकते है! सनक पारी!!’

वानखेडे मैदानावरील धुरंधर फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीचे कोडकौतुक जगभरात होत आहे. कारणही तसेच आहे. पायात वेदना असतानाही त्याने हार मानली नाही आणि त्याने केलेली नाबाद द्विशतकी खेळी चाहत्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. क्रिकेटमधील अनेक माजी क्रिकेटपटू, जाणकार, प्रेक्षक म्हणतात, की आपण अशी खेळी यापूर्वी कधीही पाहिली नाही. याबाबत व्हीव्हीएस लक्ष्मणचे ट्वीट उल्लेखनीय आहे, तो म्हणतो, ‘या खेळीने कधीही हार मानू नये याची शिकवण दिली’. हे देखील खरे आहे. कारण खेळाडू अनेकदा जायबंदी झाल्याने सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत, उलट ते थट्टेचा विषय बनतात. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एखादा संघ अडचणीत असताना त्याला बाहेर काढणारी खेळी काही खेळाडूंनी यापूर्वी केली आहे. यात १९८३ च्या विश्वचषकातील कपिल देव यांची नाबाद १७५ धावांची खेळी ही अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहे. परंतु मॅक्सवेलने पायाचे दुखणे असतानाही ज्या पद्धतीने झुंजार खेळी केली, ती यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही आणि खेळली गेलीही नाही.

मॅक्सवेलने १२८ चेंडूत २१ चौकार, दहा षटकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावा केल्या. स्टेडियमवर असणा-या, टीव्हीवर पाहणा-या क्रिकेट चाहत्यांनी मॅक्सवेलला अफगाणिस्तानाच्या जबड्यातून विजय खेचून आणताना पाहिले आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या संघाला नामोहरम करणा-या अफगाणिस्तानने २९२ धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचवेळी ९१ धावांवर सात गडी तंबूत परतलेले असताना कांगारूंच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला घास मॅक्सवेल काढून घेईल, याची सुतराम कल्पना नव्हती. कदाचित असे घडलेही नसते. मॅक्सवेल ३३ धावांवर असताना मुजीब उर रेहमानकडून सोपा झेल सुटला नसता तर.. अर्थात क्रिकेटमध्ये जर-तरला काही अर्थ नाही. हा झेल सुटला आणि अफगाणिस्तानचे आयसीसी विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत पोचण्याचे स्वप्न भंगले. अर्थात ‘जो जीता वही सिकंदर’ असेच म्हणावे लागेल. यादरम्यान, तो पायचित होण्याच्या निर्णयापासून बचावला होता. पण एक म्हण सार्थ ठरली. नशीब हे धाडसी लोकांना साथ देते.

अफगाणिस्तानसाठी फलंदाज इब्राहिम जादरान हा शतक ठोकणारा पहिला अफगाण खेळाडू ठरला. परंतु अफगाणिस्तानचे चाहते त्याचा आनंद साजरा करू शकले नाही. प्रत्यक्षात त्याने एक दिवस अगोदर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. शतक ठोकल्यानंतर जादरान म्हणाला, सचिनला भेटून माझा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या टिप्सने मला प्रेरणाा मिळाली आणि विश्वचषकात शतक ठोकणारा मी पहिला अफगाण खेळाडू ठरलो. अफगाणिस्तानने हा सामना जिंकला असता तर या सामन्याचा नायक जादरानच ठरला असता. परंतु नशिबाला हे मान्य नव्हते.
अफगाणिस्तानची २१व्या षटकापर्यंत सामन्यावर पकड होती. मात्र मॅक्सवेलने आक्रमकतेने आणि धैर्याने खेळी खेळण्यास सुरुवात केली. तो हळूहळू आपल्या संघाला ध्येयाकडे नेऊ लागला. त्याचवेळी ३४ व्या षटकात त्याला हेमस्ट्रिंग आणि कंबरदुखी होऊ लागली. तो एक-दोनदा कोसळला देखील. मात्र आपणच संघाला तारू शकतो, हे ठाम माहीत होते. म्हणून तो सतत मेडिकल टाईम आऊट घेत आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एकदा तर असे वाटू लागले की पुढचा फलंदाज झम्पा येतो की काय. मात्र मॅक्सवेलला ठाऊक होते की एकदा का लय बिघडली की मग पुन्हा सांभाळणे कठीण आहे. या कारणामुळे त्याने आपल्या वेदनांवर मात करत जिद्दीला पुढे नेले. पाय साथ देत नव्हते. त्यामुळे त्याने पळून धावा काढण्याचे जवळपास थांबवले. साधारणपणे चेंडू खेळण्यासाठी फुटवर्कचा वापर करावा लागतो. मात्र मॅक्सवेल हा उभ्याउभ्यानेच चौकार आणि षटकार ठोकू लागला.

मॅक्सवेल हा ध्येयाने पेटलेला असताना त्याने डोक्याचाही वापर केला. यापूर्वीच्या अनेक सामन्यांत अनेकदा मोठ्या धावसंख्येकडे जाताना जोखमीचे रिव्हर्स लेप्स, स्विच हिट आणि स्लॉग स्वीपसारखे शॉट खेळताना बाद झाला आहे. मात्र या डावात त्याने खेळीचे महत्त्व ओळखून संयमाने फटके लगावले. अशा प्रकारचे शॉट खेळण्याचा मोह त्याने टाळला. मॅक्सवेलसोबत ८व्या गड्यासाठी २०२ धावांची मोलाची भागीदारी करणा-या कर्णधार पॅट कमिन्सने केवळ १२ धावा केल्या असल्या तरी ज्या रीतीने त्याने साथ दिली, ते विसरता येणार नाही. सामन्याचा नायक हा अर्थातच मॅक्सवेलच आहे. परंतु कमिन्सच्या योगदानाशिवाय कांगारूंना विजयी झेप घेता आली नसती. मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीने ऑस्ट्रेलिया उपान्त्य फेरीत पोचला आणि त्याचवेळी अनेक विक्रमांची नोंदही झाली आहे. पण या विक्रमापेक्षा संघाला विजय मिळवून देणे हे सर्वांत महत्त्वाचे ठरले. त्याचे प्रयत्न कधीही विसरण्यासारखे नाहीत. मॅक्सवेलच्या प्रयत्नामुळे ऑस्ट्रेलियाची नौका किना-याला लागली. परंतु एखादा खेळाडू अशा वेदनांचा त्रास सहन करत असेल तर त्याच्या मदतीसाठी आयसीसीने एखादी तरतूद करायला हवी. पूर्वी फलंदाज जायबंदी झाला की रनरची सोय असायची. मात्र या नियमांचा अनेक खेळाडूंनी गैरफायदा उचलला आणि त्यामुळे आयसीसीने २०११ मध्ये हा नियम काढून टाकला. रनर नियमांचा गैरवापर थांबवणे गरजेचे आहे. परंतु एखादा खेळाडू मॅक्सवेलसारखा त्रास सहन करत असेल आणि त्या संघासाठी निकाल आवश्यक असेल तर अशावेळी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोणतातरी मार्ग असणे गरजेचे आहे.

-नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR