35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाआफ्रिकेचे २१३ धावांचे आव्हान

आफ्रिकेचे २१३ धावांचे आव्हान

डेव्हिड मिलरचे शतक

कोलकाता : वर्ल्डकप २०२३ च्या दुस-या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद २४ अशी केली होती. हा सामना ऑस्ट्रेलिया लीलया जिंकणार अन् आफ्रिका ‘चोकर्स’ची ‘चोकर्स’च राहणार असे वाटत होते. मात्र डेव्हिड मिलरने (११६ चेंडूत १०१ धावा) झुंजार शतक करत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या शतकी खेळीत ५ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याला ४७ धावा करून हेन्री क्लासेनने चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेने ४ बाद २४ धावांवरून सर्वबाद २१२ धावा केल्या.

दरम्यान, सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला आयसीसी स्पर्धांचा बादशाह का म्हणतात, हे पुन्हा अधोरेखित झाले.ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी पहिल्या १३ षटकांत दक्षिण आफ्रिकेला ४ धक्के दिले. स्टार्क व हेझलवूड यांच्या भेदक मा-यासमोर आफ्रिकेची मजबूत फलंदाजांची फळी ढेपाळली. या वर्ल्डकप स्पर्धेत आफ्रिकेच्या फलंदाजांनी आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाचा पालापाचोळा केला होता, परंतु आज पाचवेळच्या विजेत्या ऑसींनी त्यांना जमिनीवर आणले. डेव्हिड मिलर आणि हेन्रिच क्लासेन यांनी ९५ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या दोघांसमोर प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना पार्ट टाईम गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने कमाल केली.

हेडने टाकलेला चेंडू ४.३ कोनातून वळला अन् क्लासेनचा त्रिफळा उडवला. या वर्ल्डकपमधील हा सर्वांत वळलेला चेंडू ठरला. क्लासेन ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांवर बाद झाला आणि मिलरसह त्याची ९५ धावांची (११३ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. पाठोपाठ त्याने मार्को यान्सेनलाही (०) माघारी पाठवले. ग्लेन मॅक्सवेल व अ‍ॅडम झम्पा यांचा चेंडू अनुक्रमे ३.४ व २.४ डिग्री कोनातून फिरत होते, त्यापेक्षा हेडचा चेंडू अधिक वळत असल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. मिलरने अर्धशतक पूर्ण करताना आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्येची दिशा दिली होती आणि त्याला गेराल्ड कोएत्झीची चांगली साथ मिळाली. मिलर व कोएत्झी यांची ५३ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. कोएत्झी १९ धावांवर झेलबाद झाला, परंतु त्याने डीआरएस घेतला असता तर तो नाबाद राहिला असता.
२०१५ च्या बाद फेरीतील सामन्यात फाफ ड्ू प्लेसिसने न्यूझिलंडविरुद्ध ८२ धावांची खेळी केली होती आणि ती वर्ल्डकपच्या बाद फेरीतील आफ्रिकेकडून झालेली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती.

आज मिलरने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. ऑसींचा प्रमुख गोलंदाज स्टार्क आला अन् त्याने केशव महाराजला माघारी पाठवले. मिलरने षटकाराने शतक पूर्ण केले. पण, अखेरच्या षटकात धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मिलर सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने ११६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४९.४ षटकांत २१२ धावांवर माघारी परतला. कमिन्स व स्टार्क यांनी प्रत्येकी ३, तर हेझलवूड व हेड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR