नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले आहे की, भारतासोबत मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा वेगाने सुरू आहे. त्यांनी या कराराला कॅनडाच्या व्यवसायासाठी आणि कर्मचा-यांसाठी गेम चेंजर (खेळ बदलणारा) असे म्हटले आहे.
कार्नी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, या करारामुळे कॅनडाला भारतासारखी मोठी बाजारपेठ मिळेल. त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ऊर्जा, कृषी, तंत्रज्ञान आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.
पीयूष गोयल सध्या तीन दिवसांच्या कॅनडा दौ-यावर आहेत. त्यांनी सांगितले की, भारत आणि कॅनडाचे उद्दिष्ट या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करणे आहे. दोन्ही देश २०३० पर्यंत आपापसातील व्यापार १७ अब्ज डॉलरवरून वाढवून ५० अब्ज डॉलरपर्यंत नेऊ इच्छितात. गोयल यांनी सांगितले की, या दौ-यात भारतातून ११२ कंपन्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक शिष्टमंडळ कॅनडात पोहोचले आहे. यात ऊर्जा, फार्मा, टेक, ऑटोमोबाइल आणि कृषी यासह अनेक क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे.
















