कोलंबो : पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुस-या वनडे मध्ये श्रीलंकेने भारताला ३२ धावांनी पराभूत केले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अविष्का फर्नांडो (४०), कामिंडु मेंडिस (४०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) या फलंदाजांच्या चिवट खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय डावाची सुरुवात दमदार झाली. पण त्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वँडरसे याने भारतीय फलंदाजांची अक्षरश: पळता भूई थोडी झाली. भारताचा डाव २०८ धावांत आटोपला तर वँडरसेने ३३ धावांत ६ बळी टिपले.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीने दमदार सुरुवात करत ९७ धावांची सलामी दिली. रोहितने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. पण जेफ्री वँडरसेच्या वादळाने भारताचा डाव उधळला. रोहित रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल (३५), विराट कोहली (१४), शिवम दुबे (०), श्रेयस अय्यर (७) आणि के एल राहुल (०) यांना वँडरसेने तंबूत पाठवले. त्यानंतर वँडरसेला बराच काळ गोलंदाजी न दिल्यामुळे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर स्थिरावले. या दोघांनी ३८ धावांची भागीदारी केल्यानंतर अक्षर पटेल बाद झाला. ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा करणा-या अक्षरला कर्णधार असलंकाने बाद केले. पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरही १५ धावांवर बाद झाला.
तत्पूर्वी, श्रीलंकेने पहिल्याच चेंडूवर पाथुम निसंकाची विकेट गमावली. दुसरा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या जोडीने संघाला ७४ धावांची भागीदारी करून दिली. वॉशिंग्टन सुंदरने ही जोडी फोडत अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांना सलग दोन षटकांत माघारी धाडले. त्यानंतर अक्षर पटेलने समरविक्रमाला १४ धावांवर, कुलदीप यादवने जनीथ लियानागेला १२ धावांवर तर सुंदरने कर्णधार चरिथ असलंकाला २५ धावांवर बाद केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था ३५व्या षटकापर्यंत ६ बाद १३६ झाली होती. नंतर दुनिथ वेल्लालागे आणि कंिमडु मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला. ७२ धावांची भागीदारी करणा-या दुनिथ वेल्लालागे कुलदीपने ३९ धावांवर तंबूत पाठवले. कंिमडू मेंडिसने ४० धावा केल्या. तर अकिला धनंजया १५ धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेने ९ बाद २४० धावा केल्या.