ल्यूसर्न : भारतीय लष्करातील जवानांनी क्रीडा जगतातील अभिमानास्पद कामगिरीसह स्वित्झर्लंडमध्ये तिरंगा फडकवला आहे. लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह यांनी ल्यूसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कप ३ स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावले. लाइटवेट पुरुष डबल स्कल्स अंतिम फेरीत लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह या भारतीय जोडीने हाँगकाँग आणि नेदरलँड्सच्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत भारताच्या नावावर ऐतिहासिक सुवर्णपदकाची नोंद केली.
लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह हे वर्ल्ड रोइंग कप मालिकेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. भारतीय जोडीने अवघ्या ६ मिनिटे २६.०९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकावर नाव कोरले. दुस-या स्थानावर हाँगकाँगची सॅन तुंग लाम आणि टिक लुन चान ही जोडी राहिली. त्यांनी ६:२७.१४ तर तिस-या स्थानावर नेदरलँड्सची एरिक व्हॅन ईजक व्हॅन हेस्लिंगा आणि फ्रेडरिक प्लोएग ही जोडी राहिली. त्यांनी ६:२७.३६ वेळ नोंदवली.
कुठे पार पडली ही नौकानयन स्पर्धा?
ल्यूसर्न येथील जागतिक नौकानयन (रोइंग) स्पर्धेत लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंह हे दोघेही भारतीय लष्करात कार्यरत आहेत. कमालीची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत १८ सदस्यीय भारतीय संघातील १७ खेळाडू हे भारतीय सैन्यातील, तर एक खेळाडू भारतीय नौदलातील आहे. ही स्पर्धा जगातील सर्वोत्तम रोइंग स्थळांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या ल्यूसर्नच्या प्रसिद्ध रोटसी सरोवरावर पार पडली. शांत पाणी आणि २,००० मीटर लांबीच्या ऑलिम्पिक दर्जाच्या सहा-लेन ट्रॅकमुळे हे ठिकाण जगातील सर्वोत्तम रोइंग स्थळांपैकी एक मानले जाते.
यापूर्वी भारताच्या खात्यात होती ३ कांस्यपदके
वर्ल्ड रोइंग कपमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी भारताने तीन कांस्यपदके जिंकली होती. त्यातील पहिले पदक २००९ मध्ये महिला गटात मिळाले होते, तर दुसरे आणि तिसरे पदक अनुक्रमे २०१९ आणि २०२२ मध्ये पॅरा युगल गटात मिळाले होते. २६ ते २८ जूनदरम्यान ल्यूसर्न येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड रोइंग कप ३ स्पर्धेत ४२ देशांतील ६५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. यंदाच्या वर्षअखेरीस होणा-या वर्ल्ड रोइंग चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते.
















