मँचेस्टर : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने निर्धारित २० षटकात १३६ धावा करत टीम इंडियासमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना शफाली वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ५ विकेट्स आणि १९ चेंडू राखून सामना जिंकला.
जुएरिया फिरदौस ३३ (३१), सोभाना मोस्टरी २२ (२६) बांगलादेशची कर्णधार निगार सुलाताना ३२ (२७) या तिघींशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला मोठी धावसंख्या करता आली नाही. परिणामी बांगलादेशचा संघ ८ विकेट्सच्या मोबदल्यात १३६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. गोलंदाजीत राधा यादवनं भारतीय संघाकडून ४ षटकात २८ धावा खर्च करताना सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
श्रीचरणीनं आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवत ४ षटकांत २१ धावा खर्च करताना २ विकेट्सचा डाव साधला. या दोघींशिवाय रेणुका सिंह ठाकूर आणि नंदिनी शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. बांगलादेशच्या संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. शफालीनं संघाला आक्रमक सुरुवात कुन दिली. दुसरीकडे स्मृती मानधना ६ चेंडूचा सामना करून ८ धावांवर माघारी फिरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही तिला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले होते.
















