दुबई : मोहम्मद शमीच्या भेदक मा-यानंतर सलामीवीर शुबमन गिलनं केलेल्या धमाकेदार इनिंगच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २२८ धावा करत टीम इंडियासमोर २२९ धावांचे टार्गेट सेट केले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सहज विजय नोंदवेल, असे वाटत होते. पण रोहित शर्मा ४१ (३६) धावा करून तंबूत परतल्यावर मध्यफळीतील फलंदाज स्वस्तात आटोपले. विराट कोहली २२ (३८) आणि श्रेयस अय्यर १५ (१७) पाठोपाठ अक्षर पटेलची ८ (१२) विकेट पडल्यावर सामन्यात ट्विस्ट येतोय असे चित्र निर्माण झाले होते. पण शुबमन गिल आणि लोकेस राहुल जोडी जमली. आणि शेवटी भारतीय संघाने सामना जिंकला.
भारतीय संघाने १४४ धावांवर चौथी विकेट गमावली होती. भारताची बॅटिंग लाइन मोठी असली तरी दुबईच्या स्लो खेळपट्टीवर २२९ धावांचा पाठलाग करणंही मुश्किल वाटत होते. या परिस्थितीत गिलची साथ द्यायला लोकेश राहुल मैदानात उतरला. त्याने ४७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ४१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचा कॅच सुटला हा मॅचचा एक टर्निंग पाइंट होताच. याशिवाय शुबमन गिलची संयमी खेळी टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरली.
तो शेवटपर्यंत थांबला आणि लोकेश राहुलने षटकार मारत मॅच संपवून यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी टीम इंडिया तयार आहे असा संकेत दिला. शुबमन गिलने १२९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मतीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. या जोडीनं ३.३ षटके आणि ६ विकेट्स राखून भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला विजय पक्का केला.