21.3 C
Latur
Sunday, February 1, 2026
Homeराष्ट्रीयबंगालमध्ये एसआयआरमधून घुसखोर बाहेर काढणार

बंगालमध्ये एसआयआरमधून घुसखोर बाहेर काढणार

जे राहतील त्यांना भाजपचा मुख्यमंत्री बाहेर काढेल

कोलकाता : गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या नॉर्थ परगना येथे सांगितले की, ममता सरकार घुसखोरांना संरक्षण देत आहे. बंगालचे लोक टीएमसीला उपटून टाकतील. त्यांच्या निरोपाची वेळ आली आहे.

ममताजींना एसआयआरचा जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करू द्या. मतदार यादीतून घुसखोरांना काढावेच लागेल. जे घुसखोर उरले असतील, त्यांना भाजपचा मुख्यमंत्री येऊन बाहेर काढेल. वर्ष २०२६ हे टीएमसीला टाटा, बाय-बाय म्हणण्याचे वर्ष आहे. टीएमसी तर कम्युनिस्टांपेक्षाही पुढे गेली आहे. जेव्हा मी आधी आलो होतो, तेव्हा मी म्हटले होते की पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने भाजपचे सरकार बनेल. त्यावेळी ममता बॅनर्जी माझी खिल्ली उडवत होत्या. पण जेव्हा भगवान रामाने रामसेतू बांधला होता, तेव्हा रावणानेही त्याच प्रकारे त्यांची खिल्ली उडवली होती.

२०२४ मध्ये तीन दशकांनंतर पहिल्यांदाच मोदी सलग तिस-यांदा या देशाचे पंतप्रधान बनले आहेत. २४ मध्येच आम्ही आंध्र प्रदेशात सरकार बनवले. आम्ही ओडिशात सरकार बनवले. अरुणाचलमध्ये तिस-यांदा सरकार बनवले. २०२५ मध्ये हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ३० वर्षांनंतर सरकार बनवले आणि २५ च्या अखेरीस बिहारमध्येही प्रचंड बहुमताने भाजप आणि एनडीएचे सरकार बनले.

स्वातंत्र्य संग्रामात जेवढे लोक शहीद झाले, ज्यांना फाशीच्या दोरीवर लटकवण्यात आले, त्यांचा शेवटचा शब्दही वंदे मातरम हाच होता. मोदी सरकारने वंदे मातरम् चे १५० वर्षं देशभरात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. पण विडंबना बघा की वंदे मातरमचा उगम बंगालच्या भूमीतून झाला, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केला. त्याच वंदे मातरम् वर जेव्हा संसदेत चर्चा सुरू होती, तेव्हा ममता बॅनर्जींचे खासदार त्या चर्चेला विरोध करत होते.

आनंदपूरमध्ये लागलेली आग हा अपघात नाही. २५ लोकांचा जीव गेला आहे आणि २७ लोक बेपत्ता आहेत. ही घटना का घडली? या मोमो फॅक्टरीमध्ये कोणाचे पैसे गुंतवले आहेत? मोमो फॅक्टरीचे मालक कोण आहेत? आनंदपूर गोदामाला लागलेली आग ओरडून सांगत आहे की यात ममता बॅनर्जींचे लोक सामील आहेत. जर ममता बॅनर्जींना हे लपवायचे असेल, पण एप्रिलनंतर, जेव्हा भाजप सरकार येईल, तेव्हा आम्ही या आगीच्या दोषींना निवडून निवडून तुरुंगात पाठवू. खरं तर, २६ जानेवारी रोजी आनंदपूरमधील एका कारखान्यात आग लागल्याने २५ लोकांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR