कोल्हापूर : प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामध्ये मे २०२३ पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु या पदभरतीत आपल्यावर अन्याय होत आहे, असे म्हणत काही उमेदवारांनी रविवारी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे उमेदवारांवर अन्याय होत असल्याची तक्रार केली.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग अर्थात ऊटएफमध्ये रिक्त जागांच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवली जात आहे. १० मे २०२३ रोजी याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. साधारण ४० पेक्षा जास्त पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीमधील विसंगतीमुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांवर आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा सूर आहे. चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलेअर आणि चालू आर्थिक वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमाणपत्र स्वीकारणे अपेक्षित असतानाही ते स्वीकारले जात नाही. इश्यू डेटचा मुद्दा मुद्दा पुढे करून पात्र उमेदवारांना अपात्र केले जात आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
राज्यातील ओबीसी आणि मराठा प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याने रविवारी कोल्हापुरात राज्यभरातील अन्यायग्रस्त विद्यार्थी एकवटले होते. साधारण दोनशेच्या आसपास उमेदवारांनी आवाज उठवला असून सातशेपेक्षा जास्त उमेदवारांवर तांत्रिक कारणामुळे अन्याय होत असल्याचे म्हटले आहे.