सोलापूर – होटगी रस्त्यावरील हत्तुरे वस्तीत राहणाऱ्या सालिया महिबूब शेख (वय २५) या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्तांमार्फत करण्यात येणार असून संबंधित पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सालिया हिचे लग्न मोडल्याने लग्नादिवशीच तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. याबाबत तिचे वडील महिबूब साहेबलाल शेख (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समीर चाँदसाब शेख, सलमान पीरसाब शेख, वसीम सैफन शेख (रा. कुमठे, ता. उ. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर बाकीचे आरोपी अद्याप फरार आहेत.
संशयित आरोपी समीर याने सालिहा हिला लग्नासाठी मागणी घातली होती. तेव्हा तिने त्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिचा वेळोवेळी पाठलाग करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि आरोपी सलमान याच्यामार्फत तिला खाण्याचे पदार्थ पाठवून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. दमदाटी करून आरोपी तिला ब्लॅकमेलिंग करत होते. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी तिच्या वडिलांनी या तिघांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी म्हणून विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
तर पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणात नेमके काय घडले, पोलिसांनी कारवाई केली की नाही, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश दिल्याचे पोलीस आयुक्त डॉ. माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.