मुंबई : प्रतिनिधी
आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी आज प्रत्येक संघाने आपल्या कायम खेळाडूंची यादी जाहीर केली असून, यंदा चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच चेन्नईने धोनीला कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्येही धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार आहे. मुंबई संघातही बरेच फेरबदल झाले असले तरी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच राहणार आहे. मात्र, होय…नाही.. म्हणत गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई संघात दाखल झाला आहे. त्यामुळे गुजरात संघाला हा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आयपीएलच्या संघांनी अनेक खेळाडूंना नारळ दिला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडू बदललेले दिसणार आहेत.
आयपीएल २०२४ साठी चेन्नई संघाने धोनीला कायम ठेवले आहे. त्यामुळे २०२४ मध्येही तोच संघाची धुरा सांभाळेल. मात्र, त्याचवेळी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला सोडले आहे. यासोबतच ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, आकाश सिंग, अंबाती रायडू (निवृत्त), सिसांडा मगला, भगत वर्मा यांना बाहेरचा रस्ता दाखविला. मुंबई संघातही बरेच फेरबदल झाले आहेत. मात्र, रोहित शर्माकडेच संघाचे नेतृत्व असणार आहे. मुंबई संघाने एकूण ७ खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखवला. यात स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचाही समावेश आहे. त्यातच गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याही मुंबई संघात दाखल झाला आहे. अगोदरच पांड्या घरवापसी करणार, अशी चर्चा होती. परंतु त्यानंतर पांड्या गुजरातचाच कर्णधार असेल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे होय..नाही.. म्हणत पांड्या पुन्हा मुंबई संघात परतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गुजरात संघाला झटका मानला जात आहे.
यासोबतच किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल ११ खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन अॅलन, मिचेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव आणि केदार जाधव यांचा समावेश आहे. लखनौ संघाने के. एल. राहुलकडे नेतृत्व कायम ठेवले आहे. तसेच क्विंटन डी कॉक, निकोलस पुरन कायम आहेत. मात्र, जयदेव उनाडकट, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे, मनन वोहरा आदींना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तसेच कोलकाता संघात नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, श्रेयस अय्यर कायम आहेत, तर शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, शकीब अल हसन, लिटन दास यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे कायम ठेवले आहे. यासोबतच जोस बटलर, अश्विन, नवदीप सैनी, संदीप शर्मा कायम आहेत तर जो रुट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर बाहेर पडले आहेत.
८५ क्रिकेटपटूंना बाहेरचा रस्ता
इंडियन प्रीमियर लीग २०२४ रिटेन्शन डेडलाइनच्या दिवशी तब्बल ८५ खेळाडूंना सोडण्यात आले आहे. तर वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आयपीएल २०२४ मधून बाहेर पडलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स आणि जो रूट यांनाही सोडण्यात आले आहे. जवळपास सर्वच संघांनी अनेक क्रिकेटपटूंना बाहेर काढले आहे. त्यामुळे यावेळी बरेच नवे चेहरे दिसणार आहेत.