अमरावती : पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची शासनाने मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी बदली करून ‘डिमोशन’ केले आहे. मात्र, पत्नीच्या छळप्रकरणी अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त गायकवाड बाप-लेकांना मानसिक त्रास आणि ‘डिमांड’ पूर्ण न करणा-या तुरुंगातील सात जणांचे सुपेकरांनी निलंबन केले होते. त्यामुळे सुपेकरांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन नव्याने समोर आले आहे.
आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याकडे नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कारभार असताना, त्यांनी १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहात ‘अनऑफिशियल’ भेट दिली होती. कारागृहात बंदिस्त असलेल्या पुण्यातील हाय प्रोफाइल गायकवाड बाप-लेकांना तुरुंगाधिका-यांसमक्ष टार्गेट केले होते. ११०० पेक्षा जास्त कैदी असताना, सुपेकरांनी गायकवाड बाप-लेकांचीच भेट का घेतली, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.