वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायलच्या लष्कराने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्तपण इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले होते. या संघर्ष आता चांगलाच वाढला असून अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेल्या खर्ग बेटावरील लष्करी लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली होती. यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. या संघर्षात इराणचा या मोठा पराभव झाला असून ते आता करारासाठी प्रयत्न करत आहेत, पण हा करार मला हवा तसा नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रूथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की फेक न्यूज मीडियाला अमेरिकेच्या लष्कराने इराणविरुद्ध किती चांगली कामगिरी केली हे दाखवणे अजिबात आवडत नाही. इराणचा पूर्णपणे पराभव झाला असून ते आता एक करार करू इच्छित आहेत पण असा करार नाही जो मी स्वीकारेन. खर्ग हे बेट पर्शियन आखातात असून ते इराणच्या तेल निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच इराणच्या ऊर्जा क्षेत्रासाठी याचे महत्त्व खूपच जास्त आहे. तसेच अमेरिकेने नैतिकतेच्या आधारावर येथील तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य न करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प म्हणाले. मात्र यावेळी ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर होर्मुझच्या समुद्रधुनीमधून जाणा-या जहाजांना कसलाही अडथळा करण्यात आला तर अमेरिका या बेटावरील तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करेल.
अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावर हल्ला
ट्रम्प यांनी दुस-या एका ट्रूथ सोशल पोस्टमध्ये सांगितले की, अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटावर मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली बॉम्बहल्ला केला आहे. तसेच ट्रम्प यांनी दावा केला की आमेरिकन लष्कराने या बेटावरील लष्करी लक्ष्य पूर्णपणे नष्ट केले. तसेच ट्रम्प यांनी तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नसल्याचेही यावेळी नमूद केले आहे.
