तेलअवीव : इस्रायल आणि हमास यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एक प्रस्ताव आणण्यात आला होता. यात इस्रायलला तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रस्तावापासून भारताने स्वत:ला दूर ठेवले होते. यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताच्या या भूमिकेंसंदर्भात भाष्य केले आहे.
भारतासह कोणताही सुसंस्कृत देश अशा प्रकारचा रानटीपणा खपवून घेणार नाही, असे नेतन्याहू यांनी म्हटले होते. या प्रस्तावासंदर्भातील भारतासारख्या मित्र देशाच्या भूमिकेवर टीका करतावा नेतन्याहू म्हणाले, ‘मला वाटते की, त्या प्रस्तावात बरीच कमतरता होती. मला हे पाहून अत्यंत वाईट वाटले की, आमचे अनेक मित्रदेखील, इस्रायलमध्ये जे काही घडले त्याचा तीव्र निषेध व्हायला हवा होता, यावर जोर द्यायला तयार नाहीत. इस्रायलमध्ये असे घडले की, जे भारतासारखा कोणताही सुसंस्कृत देश सहन करू शकत नाही. यामुळे मला आशा आहे की, अशा प्रकारचे प्रस्ताव पुन्हा आणले जाणार नाही.
शत्रुत्व संपवण्यास सहमत नाही
नेतन्याहू पुढे म्हणाले, ‘ज्या पद्धतीने पर्ल हर्बरवरील बॉम्ब स्फोटांनंतर आणि ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने युद्धविराम मान्य केला नाही. त्याच पद्धतीने इस्रायलही हमास सोबतचे शत्रुत्व संपवण्यासाठी तयार होणार नाही. इस्रायल कधीही शत्रुत्व संपवण्यास सहमत होणार नाही.
ही वेळ युद्धाची
युद्धविरामासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, युद्धविरामाचे आवाहन म्हणजे, इस्रायलसाठी हमास समोर आत्मसमर्पण करण्याचे, दहशतवादासमोर आत्मसमर्पण करण्याचे, रानटीपणासमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन आहे आणि हे कधीही होणार नाही. बायबलमध्ये लिहिले आहे, एक वेळ शांततेची असते आणि एक वेळ युद्धाची असते. ही वेळ युद्धाची आहे.