ठाणे : ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणा-या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रक काढले आहे.
व्हायरल करण्यात आलेली ऑडिओ क्लिप ही बनावट आणि एआय जनरेटेड असल्याचा दावा करत, दिशा सालियान प्रकरणात एफआयआर आणि तक्रारीत अनेकदा नाव असताना आदित्य ठाकरेंना अटक का झाली नाही? असा सवाल करत त्यांनी ठाकरे गटालाच थेट पिंज-यात उभे केले. पत्रकार परिषदेत बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.
हत्येनंतर नोंदवलेल्या मूळ एफआयआरमध्ये माझे किंवा माझ्या पतीचे नाव आरोपी म्हणून कुठेही नव्हते. मात्र, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मारून, मृतदेहाची विटंबना करत पोलिसांवर दबाव आणला आणि पुरवणी जबाबात संशयित म्हणून आमचे नाव गोवण्याची धडपड केली. गेल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी इतके खालच्या पातळीचे राजकारण पाहिलेले नाही.
संवेदनशील परिस्थिती असताना पूर्णेकरांच्या लहान मुलाच्या तोंडातून जाणीवपूर्वक शब्द वदवून घेतले जात आहेत. रागाला डोळे आणि बुद्धी नसते, त्याचा गैरफायदा घेऊन कुटुंबीयांचे ब्रेनवॉश केले जात आहे.
















