जेरूसलेम : गेल्या काही काळापासून इस्रायल हा देश सतत चर्चेत आहे. इस्रायलने इराणसोबत युद्ध लढले होते, त्यानंतरही अनेक देशांवर हल्ले केले होते. इस्रायलने अमेरिकेचा मित्र देश कतारवरही हल्ला केला होता. त्यानंतर अनेकांनी इस्रायल आता आगामी काळात तुर्कीवर हल्ला करणार असल्याचे भाकित केले होते. इस्रायली शैक्षणिक आणि राजकीय तज्ज्ञ मीर मसरी यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘आज कतार, उद्या तुर्की’ अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे आता इस्रायल तुर्कीवर हल्ल्याच्या तयारीत आहे, हे स्पष्ट होत आहे.
मीर मसरी यांच्या विधानानंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या सल्लागारानेही इस्रायलला इशारा दिला आहे. लवकरच इस्रायल नकाशावरून पुसला जाईल असे या सल्लागाराने म्हटले आहे. यावर बोलताना अमेरिकन थिंक टँकचे तज्ज्ञ मायकेल रुबिन यांनी तुर्कीला सावध केले आहे. त्यांनी म्हटले की, तुर्कीने सुरक्षेसाठी नाटो किंवा अमेरिकेवर अवलंबून राहू नये. त्यानंतर आता तुर्कीने आम्ही आमच्या प्रादेशिक हितांचे रक्षण करू अशी भूमिका घेतली आहे.
तुर्की आणि इस्रायलच्या संबंधांमध्ये तणाव
तुर्की आणि इस्रायल यांच्यातील संबंध आधीच ताणले गेलेले आहेत. गाझा युद्धामुळे तुर्कीने इस्रायलसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. इस्रायल संपूर्ण मध्य पूर्वेतील देशांवर वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात असून इतर देशांना कमकुवत करत असल्याचा तुर्किचा आरोप आहे. याआधी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी असे म्हटले होते की, मी एका ग्रेटर इस्रायलची कल्पना करत आहे. यात सीरिया, लेबनॉन, इजिप्त आणि जॉर्डन या देशांच्या काही भागांचा समावेश करण्याची योजना आहे. मात्र तुर्की याला विरोध करत आहे.
















