उत्तर गाझा : शुक्रवारी आठवडाभर चाललेला युद्धविराम संपुष्टात आल्यानंतर इस्रायलने पुन्हा हल्ले सुरु केले. संपूर्ण गाझा पट्टीतील इमारतींवर इस्रायलने केलेले हवाई हल्ल्यात किमान १७८ लोक ठार झाले आहेत, असे तेथील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने गाझावर केलेल्या पहिल्या एका तासात मोठी जीवितहानी झाली. इस्रायलने हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. गाझामधील दहशतवाद्यांनी इस्रायलवर पुन्हा रॉकेट डागण्यास सुरुवात केली. त्यानंतर लेबनॉनच्या उत्तर सीमेवर इस्त्रायल आणि हिजबुल्लाह दहशतवादी यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. युद्धविरामासाठी मध्यस्थी करणा-या कतारने सांगितले की युद्धविराम वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इस्रायलने गाझामधील सुमारे १०० ओलिसांना मुक्त करण्याच्या बदल्यात ३०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली होती.
७ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या युद्धात गाझामधील १५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर इस्रायलमधील मृतांची संख्या सुमारे १,२०० आहे. हिजबुल्लाहकडून सांगण्यात आले आहे की, शुक्रवारी उशिरा सीमेवरील इस्रायली लष्करी स्थानांवर पाच हल्ले केले. तर इस्रायलने लेबनॉन सीमावर्ती गावांवर गोळीबार करून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. हौला या सीमावर्ती भागात इस्रायलने केलेल्या गोळीबारात एक महिला आणि तिचा मुलगा ठार झाला. हिजबुल्लाहने नंतर स्पष्ट केले की हा
मुलगा त्यांच्या गटाकडून लढत होता.
गाझाच्या दक्षिणेकडील भागात इस्रायलचे हल्ले गेल्या २४ तासांपासून सुरु आहेत. रात्री ते आणखी तीव्र झाले होते. इस्रायली सैन्याने खान युनिसच्या पूर्वेकडील भागात आणि शहराच्या किनारपट्टीवर हल्ले केले. त्यांनी अनेक निवासी घरांना टार्गेट केले. गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युद्धविराम संपल्यानंतर गाझावर इस्रायलच्या बॉम्बस्फोटात किमान १७८ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, सुमारे ६०० जखमी झाले आहेत.