तेल अवीव : इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायली सैनिकांनी गाझा पट्टीतील अल-शिफा रुग्णालयात प्रवेश केला आहे. आता हमासचे कमांड सेंटर हे इस्रायली सैनिकांचे लक्ष्य आहे. अल-शिफा हॉस्पिटलच्या अंतर्गत हमासचे कमांड सेंटर असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गेल्या महिन्याभरापासून इस्रायल संरक्षण दलाने गाझाला लक्ष्य केलं आहे. सातत्याने हल्ले चढवत हमासच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. तसंच, गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदा हमासने गाझातील नियंत्रण गमावलं असल्याचं इस्रायलकडून काल सांगण्यात आलं होतं. तर, आता इस्रायलने गाझातील अल शिफा रुग्णालयाला टार्गेट केलं असून येथील विशिष्ट जागेवर ऑपरेशन राबवलं जात आहे. तसंच, हमासला आत्मसमर्पण करण्याचेही आवाहन इस्रायलकडून करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं आहे. रुग्णालयात सर्वच वैद्यकीय सुविधांची वानवा निर्माण झाली असून रुग्णांचा जीव धोक्यात आलेला आहे. तर दुसरीकडे इस्रालयाने या रुग्णालयावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या रुग्णालयावरील हल्ल्यांना हमासने इस्रायल आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. तसंच, पॅलेस्टाईन आरोग्यमंत्रालयानेही इस्रायलाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, अल शिफा हे रुग्णालय आता धोक्याचे केंद्र बनले असल्याचंही सांगण्यात येतंय.
दरम्यान, गाझा पट्टीवर नरसंहार सुरू असतानाही हे युद्ध गाझातील नागरिकांविरोधात नसून हमासविरोधात असल्याचं इस्रालयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ” हमासद्वारे मानवी ढाल म्हणून वापरल्या जाणार्या नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरता आयडीएफ दलांमध्ये वैद्यकीय संघ आणि अरबी भाषिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी या जटिल आणि संवेदनशील वातावरणासाठी तयार होण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतले आहे”, असे इस्रायल सैन्याने म्हटले आहे. तसंच, रुग्णालयातील हमासच्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असा इशाराही आयडीएफकडून देण्यात आला आहे.