मुंबई : भारत पुन्हा एकदा नवा इतिहास रचून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. चांद्रयान-३ आणि आदित्य एल १ नंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सोमवार दि. १ जानेवारी रोजी पहिला एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्सपोसॅट) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झाला आहे.
कृष्णविवरांसारख्या खगोलीय सृष्टीची रहस्ये उलगडणा-या या प्रक्षेपणाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल रॉकेटवर याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये इस्रोकडून गगनयान चाचणी यान डी १ मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ही मोहीम पुढील पाच वर्षांसाठी सक्रिय राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही)-सी ५८ रॉकेट, त्याच्या ६० व्या मोहिमेवर, मुख्य पेलोड एक्सपोसॅट आणि १० इतर उपग्रह घेऊन जाणार आहे. हे पृथ्वीच्या सगळ्या खालच्या कक्षेत ठेवण्यात येईल. एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट (एक्सपोसॅट) क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यास आणि ब्लॅक होलच्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यास मदत करणार आहे. इस्रोच्या मते, अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्रोतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा स्पेस एजन्सीचा पहिला वैज्ञानिक उपग्रह आहे.
अनेक रहस्य उलगडणार
चेन्नईच्या पूर्वेला सुमारे १३५ किमी अंतरावर असलेल्या अंतराळ केंद्रातून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.१० वाजता प्रक्षेपणासाठी २५ तासांचे काउंटडाउन रविवारी ३१ डिसेंबर सुरू झाले आहे. इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की पीएसएलव्ही-सी ५८ साठी आज सकाळी ८.१० वाजता काऊंटडाऊन सुरु करण्यात आले.
नासाने देखील केला होता हा अभ्यास
भारतीय अंतराळ एजन्सी इस्रो व्यतिरिक्त, यूएस स्पेस एजन्सी नासाने डिसेंबर २०२१ मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणा-या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोने सांगितले की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे आणि या संदर्भात एक्सपोसॅट मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.