लखनौ : संसद सुरक्षेतील त्रुटी आणि लोकसभेतील घुसखोरी यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात यासंदर्भात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवर लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहातील गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनावरून सत्ताधा-यांवर सडकून टीका केली जात आहे. यातच आता बसपा सुप्रिमो मायावती यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मायावती म्हणाल्या की, विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन दुर्दैवी आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचे निलंबन हे संसदीय इतिहासासाठी दु:खद आणि लोकांच्या विश्वासाला धक्का आहे, अशी टीका मायावती यांनी केली. तसेच संसद परिसरात निलंबित खासदारांनी उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवत नक्कल केलेला व्हीडीओ व्हायरल होत आहे. ही बाबही अयोग्य आणि अशोभनीय आहे, या शब्दांत मायावतींनी विरोधकांचेही कान टोचले आहेत.
विरोधकांशिवाय विधेयके मंजूर करणे चुकीचे
विरोधकांशिवाय विधेयक मंजूर करणे ही चुकीची परंपरा असून, जुनी परंपरा जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मायावती यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचाही मुद्दा उपस्थित केला आणि संसदेच्या सुरक्षेतील भंग हाचिंतेचा विषय असल्याचे सांगितले. संसदेत झालेली सुरक्षेची चूक चांगली नाही. ही अत्यंत गंभीर आणिचिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी मिळून संसदेच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दबाव टाकून चालणार नाही. कट रचणा-यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत मायावती यांनी व्यक्त केले.