गडचिरोली : प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कांकेर येथील कोयालीबेडा परिसरात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. त्यातच आज एका जहाल महिला माओवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (३०) असे या महिला जहाल माओवाद्याचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या जहाल महिला माओवादीचा अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असून पोलिसांनी तिच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
नक्षलवाद्यांसाठी फेब्रुवारी ते मे हा महिना टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन म्हणजेच टीसीओसी असा कालावधी असतो. पोलिसांसाठी हा कालावधी शहीद आठवड्यापेक्षा किती तरी जास्त आव्हानात्मक असतो. कारण याच कालावधीत नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्याचा प्रयत्न करतात तर पोलिसही याच कालावधीत नक्षलवादाच्या माध्यमातून देशाच्या व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या सशस्त्र लढाईला चोख प्रतिउत्तर देतात. या दरम्यान नक्षल्यांकडून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे आणि इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे आदी देशविघातक कृत्य करण्याचे प्रयत्न केले जातात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विविध हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले.
हिंसक कारवायांत सक्रिय सहभाग
पकडण्यात आलेल्या ३० वर्षीय जहाल महिला माओवादी राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिचा अनेक सशस्त्र कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता. यात एप्रिल २०२३ मध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलिस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलाने विशेष अभियान राबवून तिला अटक केली.