40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयपाकला जाणारे रावी नदीचे पाणी रोखले

पाकला जाणारे रावी नदीचे पाणी रोखले

पठाणकोट : वृत्तसंस्था
भारताने अखेर पाकिस्तानात जाणारे रावी नदीचे पाणी रोखले आहे. तब्बल ४५ वर्षांपासून वाट पहिली जात असलेले रावी नदीवरील शाहपूर कंडी धरण अखेर पूर्ण झाले. त्यामुळे कित्येक वर्षांपासून पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

जागतिक बँकेच्या देखरेखीखाली १९६० मध्ये झालेल्या सिंधू जल कराराअंतर्गत रावीच्या पाण्यावर भारताचा विशेष अधिकार आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात शाहपूर कंडी बॅरेज जम्मू-काश्मीर आणि पंजाब यांच्यातील वादामुळे अडकून पडला होता. मात्र मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानात वाहून जात होते. सिंधू जल कराराअंतर्गत रावी, सतलज आणि व्यास नद्यांच्या पाण्यावर भारताचा संपूर्ण अधिकार आहे तर सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे.

१९९७ मध्ये पंजाब आणि जम्मू-काश्मीर सरकारांनी पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी रंजीत सागर धरण आणि डाउनस्ट्रीम शाहरूर कंडी बॅरेज तयार करण्यासाठीच्या करारावर स्वाक्ष-या केल्या. या कराराअंतर्गत जम्मू-काश्मीरचे तात्कालीन मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला आणि पंजाबचे प्रकाशसिंह बादल यांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. १९८२ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या योजनेची पायभरणी केली होती. त्यानंतर १९९८ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

रणजीत सागर धरणाचे बांधकाम २००१ मध्ये पूर्ण झाले होते. शाहपूर कंडी बॅरेज तयार होऊ शकले नाही आणि रावी नदीचे पाणी पाकिस्तानला मिळत राहिले. २००८ मध्ये शाहपूर कंडी योजनेला राष्ट्रीय योजना घोषित करण्यात आले होते. मात्र, बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले. २०१४ मध्ये पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यात वादा सुरू झाल्याने ही योजना पुन्हा लांबत गेली.

अखेर २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या मध्यस्थीमुळे दोन्ही राज्यांमध्ये करार झाला, यानंतर हे धरण बांधण्यास सुरुवात झाली. यामुळे पाकिस्तानात जाणारेपाणी आता जम्मू-काश्मीर मधील दोन प्रमुख जिल्हे कठुआ आणि सांबा येथे मोठा प्रदेश सिंचनाखाली येणार आहे. ११५० क्यूसेक पाणी आता ३२,००० हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी वापरले जाईल. या धरणामुळे तयार होणा-या वीजेचा २० टक्के लाभ जम्मू काश्मीरला मिळणार आहे.

पंजाब, राजस्थानलाही होणार फायदा
५५.५ मीटर उंचीचे हे शाहपूर कंडी धरण एक बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पाचा भाग आहे, ज्यामध्ये एकूण २०६ मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत. हे रणजीत सागर धरण प्रकल्पाच्या खाली ११ किमी अंतरावर रावी नदीवर बांधले आहे. धरणाचे पाणी जम्मू-काश्मीरशिवाय पंजाब आणि राजस्थानलाही मदत करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR