नाशिक : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या लोकार्पणासाठी निमंत्रण देण्यावरून मानापमान सोहळे सुरू असतानाच आता माजी मंत्री उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देऊन देखील आता ते अयोध्येला जाणार नसल्याचे समोर आले आहे. ठाकरे हे २३ तारखेला नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिबिर असून त्यानिमित्ताने श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनित या भूमीतच जय श्री राम म्हणणार आहेत तसेच श्री काळाराम मंदिर येथे विधीवत पूजा करून गोदाआरती देखील करणार आहेत.
अयोध्येतील श्री राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा २२ जानेवारीस होणार आहे. त्यानिमित्ताने निमंत्रण पत्रिका दिल्या जात असताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टाळले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हणजेच रामभूमीतच केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते.
दरम्यान, येत्या २३ जानेवारीला नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिीबर असून त्यासाठी उध्दव ठाकरे नाशिकला येणार आहेत. त्यांची सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्याऐवजी नाशिकमध्येच श्री राम मंदिरात उत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे. नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात पूजन करून गोदाआरती करण्यात येणार आहे. उध्दव ठाकरे यांनी मुंबईत देखील त्याची पुष्टी केली आहे.