मुंबई : साऊथचा सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा सिनेमा ‘जन नायकन’ अखेर प्रदर्शित झाला आहे. गुरुवारी (२३ जुलै) थलपती विजयचा हा सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात जन नायकन सिनेमाचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. या सिनेमाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
जन नायकन सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच हजारो तिकिटांची विक्री झाली होती. अनेकदा सिनेमाची रिलीज डेट बदलल्याने जन नायकन सिनेमा कधी रिलीज होणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. त्यामुळे थलपती विजयचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांनी थिएटरच हाऊसफूल केले. अॅडव्हान्स बुकिंगमधून जन नायकनने तब्बल २८ कोटी कमावले. तर सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, जन नायकनने पहिल्याच दिवशी ४१ कोटींचा गल्ला जमवला आहे. तमिळ व्हर्जनमध्ये सगळयात जास्त ३६.५० कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे. जन नायकन सिनेमाने बॉलिवूडच्या मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड पहिल्याच दिवशी मोडले आहेत. विकी कौशलच्या छावा आणि रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचे रेकॉर्ड मोडण्यात थलपती विजयला यश मिळाले. छावा सिनेमाने पहिल्याच दिवशी ३३.१० कोटी कमावले होते. तर धुरंधरने २८.६० कोटींचा गल्ला जमवला होता.
जन नायकन सिनेमाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे. या सिनेमात थलपती विजय मुख्य भूमिकेत असून पूजा हेगडे, बॉबी देओल, गोतम वासूदेव मेनन, प्रकाश राज आणि नारायण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा थलपती विजयचा शेवटचा सिनेमा आहे. राजकारणात एन्ट्री घेण्याआधी त्याने हा सिनेमा शूट केला होता.
















