27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंनी छगन भुजबळांना नाशकातच घेरले!

जरांगेंनी छगन भुजबळांना नाशकातच घेरले!

नाशिक : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारून आरपारची लढाई सुरू केलेल्या आणि आठवडाभरापासून राज्याच्या दौ-यावर असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज (२२ नोव्हेंबर) बुधवारी नाशिकमध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सहभागाबद्दल महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. २४ डिसेंबरपूर्वी सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार असल्याने आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात असल्याचा दावाही त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता सडकून टीका केली. भुजबळांचे नाव न घेता ते म्हणाले की, ‘तू कुठे भाजी विकायचा, कोणाचे बंगले बळकावले, मुंबईत तुम्ही काय केले, कोणत्या चित्रपटात आणि नाटकात काम केले हे मला माहीत आहे. २०१६ मध्ये ज्या घोटाळ्यात भुजबळांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी घोषित केले होते, त्या घोटाळ्याचा संदर्भ देत जरांगे-पाटील म्हणाले की, लोकांच्या पैशाची लूट झाली आणि ‘म्हणून तुम्हाला (भुजबळ) तुरुंगवास भोगावा लागला’. २०११मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाली होती.

तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाही?
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही बाजू घेत समर्थन नसल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी नाशिकमध्येच भुजबळांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, म्हाता-या माणसाने जास्त बोलू नये, पाणी कमी पडू शकते. आता नाही, आरक्षण मिळू द्या मग बघतो. यांचे आपल्याला सगळं माहिती आहे. आड येऊ नको. तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाही? असा सवाल करत त्यांनी भुजबळांना नाशिकमध्येच घेरले.

सरकारला सांगतो यांना आवरा
त्यांनी सांगितले की, मराठे दंड थोपटल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारला सांगतो यांना आवरा. जातीयवाद पसरवत आहेत. नाही, तर मग मी पण आता मागे हटणार नाही. सरकारला विनंती करतो ते जातीय तेढ निर्माण करत आहेत त्यांना रोखा. आम्ही शांततेत जात आहोत, शांतता राखण्याचे काम सरकारचे आहे. पण सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे. आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगत आहे.

आरक्षण मी छाताडावर बसून घेतो
पोलिस भरती करायची असेल तर आमची जागा सोडा, महाराष्ट्रातील आमच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्या, आरक्षण दिले नाही तर कोटी मराठे आंदोलनाला सज्ज आहेत. नाशिकच्या पवित्र भूमीतून आवाहन करतोय, सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी मराठा लेकरांच्या पाठीशी उभे रहा, नाहीतर तुम्हाला लक्षात ठेवतील असा इशारा त्यांनी दिला. मला सगळे शत्रू मानतात, पण मी त्यांना घाबरत नाही, मराठा नेत्यांना पण नाही. फक्त तुम्ही शांत रहा, आरक्षण मी छाताडावर बसून घेतो, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR