जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाला आहे.
जरांगे यांच्यावर अंतरवाली सराटीमध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत. काल रात्री त्यांना ताप आला, त्यानंतर त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास देखील सुरू झाला. त्यामुळे त्यांच्यावर आता अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजूर केले, मात्र मनोज जरांगे अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देखील घेतला.
विधानसभेसाठी त्यांनी मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. जीथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तीथे उमेदवार देऊ, जिथे शक्यता नाही तीथे आमच्या मागण्यांचे जो समर्थन करेल त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी त्यांची भूमिका होती. मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली.
त्यानंतर आता त्यांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केली आहे. मराठा समाज सुज्ञ आहे, त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही. मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही, त्यामुळे मराठा समाजाला वाटेल त्या उमेदवाराला ते पाडतील ज्याला निवडून आणायचे आहे त्याला निवडून आणतील.
मात्र हे सर्व करत असताना आरक्षणाचा प्रश्न डोक्यात असू द्या, आपल्या विरोधात कोण आणि बाजूने कोण हे लक्षात घ्या. गाव पातळीवर उमेदवाराचे मागणीला पाठिंबा दिल्याचे व्हीडीओ बनवा, मात्र ते व्हायरल करू नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.