छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात मराठवाड्याच्या पाणीसाठ्यावरून कायम चिंता व्यक्त करत असताना मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेश पूजनाला १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याची तहान आता भागणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणे आता भरत आली असली तरी राज्याच्या तुलनेत ६५.३५ टक्के धरणे भरली आहेत.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी जायकवाडी धरणात ३२.६९ टक्के पाणीसाठा होता. आता धरण १०० टक्के भरले आहे. बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता माजलगाव धरणात २८ टक्के आणि मांजरा धरणात ७१.६६ टक्के पाणीसाठा आहे. काही दिवसांपूर्वी शुन्यावर असणारे माजलगाव धरण एका दिवसाच्या पावसात थेट १८ टक्क्यांवर गेले होते.
मराठवाड्यात अलिकडे पावसाचा जोर वाढला असून, गणरायाचेही पावसाने स्वागत केले. हवामान विभागाने मराठवाड्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वा-याची स्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण फुल्ल
हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणही फुल्ल झाले आहे. मागच्या वर्षी ४५.९३ टक्के पाणी भरले होते. येलदरी धरण ६५ टक्के भरले असून हिंगोलीत पूर आल्यानंतर आता हिंगोलीतील दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. यासोबतच परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात ७४.६७ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही आवक सुरूच आहे. त्यामुळे हे धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे.
विष्णुपुरी ९१.४७ टक्के भरले
नांदेडचे विष्णूपुरी धरण ९१.४७ टक्के आणि निम्न मनार धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे नांदेडकरांना आता दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे धाराशिव, लातूरकरांनाही दिलासा
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली असून निम्न तेरणा ६७ टक्के तर लातूरच्याही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.
मराठवाड्यात पावसाचा जोर
मागील आठवड्यात झालेल्या पावसाने मराठवाड्यात नागरिकांची दाणादाण उडाली होती. हजारो हेक्टरवरील शेती पाण्यााखाली गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी मराठवाड्याला पावसाचा इशारा दिला असून त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.