वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दक्षिण कॅरोलिनातील डेमोक्रेटची प्रायमरी निवडणूक सहज जिंकली आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षातर्फे ते प्रबळ उमेदवार असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेली चार वर्षांतील बायडेन यांची कारकीर्द पाहता ती प्रभावी दिसली नाही. त्यामुळे डेमोक्रेटिक तर्फे त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित होत होते.
बायडेन यांनी शनिवारी डेमोक्रेटमधील तीन नेत्यांचा पराभव केला. बायडेन यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, २०२० मध्ये दक्षिण कॅरोलिनाने अनेकांचा अंदाज खोटा ठरवत आमच्या कॅम्पेनमध्ये प्राण फुंकला होता. त्यानंतर आता २०२४ मध्ये देखील दक्षिण कॅरोलिना अध्यक्षपदापर्यंत मला घेऊन जाईल असा विश्वास आहे. बायडेन यांनी यावेळी, डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘लूझर’ असा उल्लेख केला. असोसिएट प्रेसने बायडेन यांना रात्री ५ वाजून २३ मिनिटांना विजयी घोषित केले.
बायडेन यांना सुरुवातीपासूनच आघाडी मिळाली होती. डेमोक्रेट पक्षाची पहिली प्रायमरी निवडणूक दक्षिण कॅरोलिनामध्ये पार पडली. राज्यात विविध समूदायाचे लोक राहतात. राज्यात कृष्णवर्णीयांची संख्या लक्षणीय आहे. दुसरीकडे, आयोवा आणि न्यू हॅम्पशायर राज्यांमध्ये गौरवर्णीय लोकांची संख्या जास्त आहे.
दक्षिण कॅरोलिना हा प्रामुख्याने रिपब्लिकनशी एकनिष्ठ आहे. पण, राज्यातील २६ टक्के जनता ही कृष्णवर्णीय आहे. २०२० च्या निवडणुकीमध्ये कृष्णवर्णीयांचा एकूण मतदानातील वाटा ११ टक्के होता. त्यातील ९ ते १० टक्के मते बायडेन यांना पडली होती. त्यामुळे कृष्णवर्णीय समूदाय बायडेन यांच्या बाजूनेच असल्याचे सध्याचे चित्र आहे.