मुंबई : जागावाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली असून, आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागांवर आपली बोळवण करता येणार नाही, असे जाहीरपणे सुनावले. महायुतीत भाजपा ३२ जागा लढवणार असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया देताना १२ जागांबाबत प्रस्ताव असेल तर तो आम्ही अजिबात मान्य करणार नाही. शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही, असे त्यांनी सांगितले तर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी आम्हाला किमान १० जागा मिळतील, असे सांगितले.
राज्यातील लोकसभेच्या जागांसाठी महायुतीत ३२-१२-४ असा फॉर्म्युला अंतिम झाला असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया विचारता खा. किर्तीकर म्हणाले की, याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. जे आकडे बाहेर चर्चेत आहेत, त्याला कुठलाही आधार नाही. मुळात जागावाटपाची चर्चा कोण करत आहे? त्याचा निर्णय कोण घेत आहे? याबाबत कुठलीही माहिती आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा एक नेता आहे. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्यासह आमच्याबरोबर असलेल्या इतर नेत्यांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र आम्हाला १२ जागा देण्याबाबत काही ठरले असेल तर ते आम्हाला मान्य नाही. गेल्या निवडणुकीत भाजपा २६ व शिवसेना २२ जागांवर लढली होती. त्यांनी २३ तर आम्ही १८ जागा जिंकल्या होत्या. २०१९ प्रमाणेच जागावाटप झाले पाहिजे, अशी आमची मागणी होती. परंतु आता आमच्या सरकारमध्ये अजित पवार आले आहेत. त्यांनाही काही जागा द्यायला लागतील. त्यामुळे आम्ही १८ जागांसाठी आग्रही राहू, असे किर्तीकर यांनी सांगितले.
भाजपाने जागा द्यायच्या आणि आम्ही त्या घ्यायच्या अशी आमची अवस्था नाही. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही, असे किर्तीकर यांनी सुनावले. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे मविआ सरकार जाऊन युतीची सत्ता आली, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या १३ खासदारांचं राजकीय भवितव्य टिकवणं, त्यांना राजकीय स्थिरता देणं हे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य आहे. एकनाथ शिंदे कोणाला दगा देणार नाहीत, असा विश्वास असल्याचेही किर्तीकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची १० जागांची मागणी !
अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी लोकसभेच्या दहा जागांची आमची मागणी असल्याचे सांगितले. लोकसभेसाठी चार जागांवर आमची बोळवण होणार नाही. अजितदादांची जिथे ताकद आहे तिथे आम्हाला लढायला संधी मिळेल व त्या सर्व जागा आम्ही ंिजकू,असे मिटकरी म्हणाले.