नागपूर : प्रतिनिधी
‘आय लव्ह यू’ म्हणणे ही मुलीसंदर्भातील भावना व्यक्त करण्याची कृती असून, केवळ ‘आय लव्ह यू’ म्हटल्यामुळे लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.
एक १७ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी २३ ऑक्टोबर २०१५ रोजी शाळेतून घरी परत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात थांबविले. तिचा हात पकडून ‘आय लव्ह यू’ म्हटले आणि तिचे नाव विचारले. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने घरी पोहोचताच, वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर, आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. १८ ऑगस्ट २०१७ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला लैंगिक छळाच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून आरोपीला निर्दोष मुक्त केले. आरोपीने मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटले, पण त्यामागे लैंगिक छळ करण्याचा त्याचा उद्देश होता, याचे ठोस पुरावे रेकॉर्डवर नाहीत. लैंगिक छळामध्ये शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, बळजबरीने निर्वस्त्र करणे, अश्लील हावभाव किंवा टिप्पणी करणे अशा प्रकारच्या कृतींचा समावेश होतो, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. रवींद्र नारेटे, असे आरोपीचे नाव असून, तो सोनोली, ता. काटोल येथील रहिवासी आहे.