छिंदवाडा : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी छिंदवाडामधील धानोरा येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. कमलनाथ यांच्याकडे १ हजार ७०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांना वाटले तर ते संपूर्ण गावात हेलिकॉप्टर वाटप करू शकतात. पण कमलनाथ विकासाच्या खोट्या गप्पा मारून ४० वर्षांपासून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला.
मुख्यमंत्री चौराई विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भाग असलेल्या धानोरा येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी ते कमलनाथ यांचा मुलगा आणि छिंदवाडाचे उमेदवार नकुलनाथ यांच्या संपत्तीवरही बोलले. नकुलनाथ यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे ७०० कोटी रुपयांची संपत्ती आहे, अशी माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला?, त्यांनी कधी तुम्हाला हेलिकॉप्टरमधून फिरवले आहे का? कुणी आजारी पडले असेल तर त्यांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेले आहेका? असा सवाल मतदारांना करत कमलनाथ आणि पंतप्रधान मोदींमध्ये हाच फरक आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कमलनाथ यांना लगावला.