मुंबई : कॅनडातील सरे शहरातील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सरे येथील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये एका महिन्याच्या आत गोळीबार होण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र, सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे गँगस्टर टोळीचा हेतू कोणाला मारणे नव्हे तर घाबरवणे हाच हेतू असल्याचे यातून दिसून येत आहे.
गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही कॅफेवर गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई अलायन्स म्हणजेच गोल्डी ढिल्लॉन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहिल दुहान पेटवाड यांनी घेतली आहे. पण अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा लॉरेन्स टोळीच्या निशाण्यावर का आहे? असा प्रश्न असा निर्माण होत आहे. विविध भारतीय सुरक्षा एजन्सींनी याची चौकशी केली आहे आणि कपिल शर्माला लॉरेन्स टोळीने लक्ष्य करण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत.
सलमानशी जवळीक भोवते का?
काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खान लॉरेन्स टोळीचे प्रमुख लक्ष्य आहे. लॉरेन्स टोळीने सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानचे फार्म हाऊस आणि त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची केवळ रेकीच केली नाही तर गॅलेक्सी अपार्टमेंटवरही गोळीबार करण्यात आला, त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. गेल्या काही वर्षांत अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा सलमान खानच्या खूप जवळचा झाला आहे. तो सलमानच्या जवळच्या सहका-यांपैकी एक मानला जातो. लॉरेन्स गँग आणि त्याच्या सदस्यांना हीच गोष्ट त्रास देत आहे आणि कपिल शर्माला लक्ष्य करून, लॉरेन्स गँग सलमानच्या इतर जवळच्या सहका-यांना इशारा देऊ इच्छितो.