बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक येत असल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर वाल्मिक कराडची तपासणी करण्यात आली. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून त्याचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा त्याची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडला ऑर्थर रोड तुरुंगात हलवा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या प्रकृती बिघडण्याबद्दल भाष्य केले. त्यात त्यांनी मोठी मागणी केली. मी पहिल्या दिवसापासून सांगते की वाल्मिक कराडला अर्थ रोड तुरुंगामध्ये शिफ्ट करा. पण माझ कुणीही ऐकत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठेतरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. वारंवार त्याची प्रकृती बिघडते. वारंवार आणि त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत असून सुद्धा त्याच्यावर कुठेतरी स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न होतोय का आणि तुरुंगात न ठेवता त्याला इतरत्र हलवण्याचा हा सगळा कट आहे का असे आमचा संशय आहे असे अंजली दमानिया म्हणाल्या.
सरकारने लक्ष देण्याची गरज
धनंजय देशमुख यांनी सुद्धा म्हटलेले आहे की या प्रकरणांमध्ये सरकारने लक्ष द्यायची गरज आहे. खरंतर गृहमंत्रालयाला पत्र लिहिण्याची सध्या तरी काय आवश्यकता आहे असे वाटत नाही. रणजीत कासले हा माणूस जरा वेगळा धाटणीचा आहे. त्यामुळे त्याच्यावर मी कुठलेही भाष्य करणार नाही. पण माझे म्हणणे एवढेच आहे की वारंवार मागणी करून सुद्धा वाल्मिक कराड याला त्याच तुरुंगामध्ये का ठेवले जाते असे त्या तुरुंगामध्ये काय आहे की त्याला त्या तुरुंगामध्ये ठेवण्याचा गरज सरकारला वाटते असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.