बीड : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आता बीडपुरते मर्यादित उरले नसून संपूर्ण राज्यभरात त्याची चर्चा आहे, वातावरणही तापू लागले आहे. या मुद्यावरून विरोधक रोजच्या रोज नवनवे दावे, आरोप करत सरकारला धारेवर धरत आहे. अजित पवार हे मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी नुकताच केला होता.
आता त्यांनी याप्रकरणी आता आणखी एक नवा दावा केला आहे. अजित पवार यांना अडकवण्याचा ( वाल्मिकी) कराडचा प्लान असावा असा आरोप सोनावणे यांनी केला आहे. ताफ्यात गाडी टाकून अजित दादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा, असा आरोप सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
माझा अजित पवारांवर कोणताही आरोप नाही, असे सोनावणे यांनी आधीच स्पष्ट केले. संतोष देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि यामागचा जो मास्टरमाईंड आहे त्यालाही फाशी झाली पाहिजे, हाच माझा फोकस आहे. अजूनही या प्रकरणातील ३ आरोपी फरार आहेत, त्यांना पकडून शिक्षा व्हावी एवढीच माझी मागणी आहे असे ते म्हणाले.
अजित दादा २१ तारखेला आले होते, हा आरोपी ( कराड) ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला, त्याच गाडीचा मालक तिथे होता. ज्याच्या नावावर गाडी आहे, तो तिथे होता. माझ्याकडे फोटो आहेत, मी विनाकारण आरोप करत नाही. अजित दादांवर माझा कोणताही आरोप नाही. अजित पवारांना काही बोलण्याचा, त्यांना टार्गेट करण्याचा माझा हेतू नाहीये, त्यांच्याविषयी बोलण्याचे मला काहीच कारण नाही. मी ( या मुद्याचं) राजकारण करत नाहीये. पण देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जे सहकार्य करत आहेत, त्यांच्यावर माझा आरोप आहे. देशमुखांचे जे मारेकरी आहेत, जे या कटात आहे, त्यांना पकडा आणि फाशी द्या एवढंच माझे म्हणणे आहे, असा पुनरुच्चार सोनावणे यांनी केला.