38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाकेकेआरची विजयी सलामी

केकेआरची विजयी सलामी

कोलकाता : आपल्या घरच्या मैदानावर सलामीचा सामना खेळून कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने विजयी सलामी दिली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारण्यात यजमान संघाला यश आले. आंद्रे रसेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर केकेआरने हैदराबादला २०९ धावांचे तगडे लक्ष्य दिले होते.

धावांचा बचाव करताना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात केकेआरने बाजी मारली. सामना केकेआरच्या बाजूने झुकला असताना हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी करून रंगत आणली. त्याने २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची स्फोटक खेळी केली. हेनरिक क्लासेनने १९ व्या षटकात ३ षटकार ठोकून हैदराबादच्या चाहत्यांना जागे केले. खरं तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई झाली.

स्टार्कच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शाहबाज अहमदने देखील षटकार ठोकला आणि केकेआरच्या ताफ्यात खळबळ माजली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. हर्षित राणाच्या पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार लगावला. मग ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. दुस-या चेंडूवर एक धाव काढली. तिस-या चेंडूवर शाहबाज अहमद बाद झाला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढल्याने क्लासेनला स्ट्राईक मिळाली. पाचव्या चेंडूवर सुयश शर्माने अप्रतिम झेल घेऊन क्लासेनला बाहेर पाठवले. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला ५ धावांची गरज होती. पण शेवटचा चेंडू निर्धाव गेला आणि केकेआरने ४ धावांनी विजय मिळवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR