38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रपूरला विजय वडेट्टीवार-सुधीर मुनगंटीवार लढत रंगणार?

चंद्रपूरला विजय वडेट्टीवार-सुधीर मुनगंटीवार लढत रंगणार?

नागपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी विदर्भातील सहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, काँग्रेसने ४ नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. मविआत वर्धा आणि चंद्रपूर अद्याप घोषणा व्हायची असली तरी चंद्रपूरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती असून वर्धा राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार आहे.

नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे तर रामटेकला माजी मंत्री सुनील केदार गटातर्फे माजी जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांना संधी दिली आहे. शिवसेना आणि भाजपच्या वादात महायुतीचे तिकिट रखडले आहे.

शनिवारी उशिरा काँग्रेसने यादीत विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र सर्वाधिक चर्चेत आणि जातीय समीकरण, पत्रकबाजीत वादात सापडलेली चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.
अखेरच्या टप्प्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे तिकिट जवळपास फायनल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याऐवजी पडोळे यांना संधी दिली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये नागपूरसाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लढावे लागणार आहे.

काल धुमधडाक्यात एकीकडे गडकरी यांच्या जम्बो प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, पारिवारिक संमेलन होत असताना विकास ठाकरे यांच्यासाठी महाकाळकर सभागृहात कार्यकर्ता मेळावा झाला. काँग्रेसने गडचिरोलीहून डॉ. नामदेव किरसान, रामटेक येथून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉ. प्रशांत यादवराव पडोळे या नव्या चेह-यांना संधी दिली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर व ब्रह्मपुरीचे आमदार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकिट देण्यासाठी, वडेट्टीवार यांना विरोधासाठी काँग्रेसचे दोन्ही गट उघडपणे रस्त्यावर आले. शिवानी वडेट्टीवार यांच्याऐवजी तुम्ही लढावे असे हायकमांडने सांगितल्याने वडेट्टीवार यांना तयार व्हावे लागणार आहे.

मात्र, धानोरकर गटाला कामाला लावण्यात त्यांना कितपत यश येते यावर मुनगंटीवार-वडेट्टीवार लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे शरद पवार गट राष्ट्रवादी तर्फे तुतारी हाती घेऊन मैदानात उतरणार आहेत. अद्याप घोषणा झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR