मोहोळ : सध्या मोहोळ तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये पेस्ट लावणे व घड विरळणी काम सुरू आहे. महिला मजुरांना ५५० रुपये दिवसाला, तर पुरुष मजुरांना ७०० ते ८०० रुपये रोजगार द्यावा लागत आहे. या पावसामुळे व दिवाळी सणामुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. मोहोळ तालुक्याला वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने झोडपले. या पावसामुळे द्राक्षे, कांदा तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यातील नरखेड, कोन्हेरी, सावळेश्वर, वडवळ, सय्यदवरवडे, कातेवाडी, कुरूल, कामती, अंकोली, बेगमपूर, इंचगाव, पेनूर, पाटकूल, अनगर, शेटफळ, मलिकपेठ, भोयरे, हिंगणी (नि), भांबेवाडी, खुनेश्वर, डिकसळ, मसलेचौधरी, देगाव, वाळूज, एकुरके, बोपले, यल्लमवाडी आदी भागांत अचानक विजांच्या कडकडाटांसह कुठे साधारण, तर कुठे मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे काढणी चालू असलेल्या कांदा पिकाचे तसेच पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
पोंग्यात पाणी गेल्याने द्राक्ष घड जिरुन जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांतून निर्माण झाली आहे. सध्या द्राक्षबागांमधील घड पोंगा अवस्थेत असल्याने या पावसाने घडात पाणी साठून फळकूज होण्याची भीती भैरववाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी व्यक्त केली.
सोयाबीन उत्पादक शेतकरी पावसाळ्यात सतत झालेल्या पावसाला पुरता वैतागला होता. शेतात पाणी साठल्याने सोयाबीन काढता येईना. काढलेले सोयाबीन मशिनद्वारे करण्यासाठी आवश्यक असलेली मळणी मशीन जमिनी ओली असल्याने शेतात नेता येईनात. आता उन पडू लागल्याने जमिनी वाफशाला आल्या होत्या. तोपर्यंत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आले आहेत. या पावसाने चालू असलेल्या रब्बीतील ज्वारीच्या पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत.
मात्र पेरणी झालेल्या ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. उसातली ओल लवकर हटेल की नाही, याची चिंता ऊस उत्पादकांना लागली आहे. काही कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा काढून चिरुन मार्केटला नेण्यासाठी शेतात उघड्यावर टाकला होता. जोरदार पाऊस झल्याने काढून टाकलेल्या व चिरुन ठेवलेल्या उघडा कांदा झाकता न आल्याने कांदा भिजून मोठे नुकसान झाले.