20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रलालपरीची चाके थांबणार?

लालपरीची चाके थांबणार?

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचा-यांचा संपाचा इशारा

बुलडाणा : प्रतिनिधी
राज्यभर एसटीचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृति समितीची बुलडाणा येथे बैठक पार पडली. एसटी कर्मचा-यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी येत्या ३ सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे संकेत आज बैठकीत देण्यात आले.

३ सप्टेंबरनंतर गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे. परिणामी ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृति समितीच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

या आंदोलनाविषयी बोलताना कृति समितीच्या अधिका-यांनी सांगितले की, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळाचा आशिया विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने कर्मचा-यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृति समिती तयार झाली आणि २०१६ पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतानाच त्यांनी कामगारांनाही न्याय द्यावा. वेतन आयोगाने राज्य सरकारी कर्मचा-यांना कार्यकाळ जाहीर करून वेतनाप्रमाणे वेतनवाढ करावी, अन्यथा एसटी कर्मचारी कृति समितीच्या माध्यमातून ३ सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडतील, असा संकेत त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिका-यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली.

राज्यभरात आक्रोश आंदोलन
याची दखल घेऊन मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली. तसेच पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

कृति समितीच्या माध्यमातून आक्रोश
एसटी महामंडळ आर्थिक संकटात होते. आता आर्थिक संकटातून बाहेर पडलेले असताना गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचा करार प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने विविध पातळीवर मागण्या करण्यात आल्या. परंतु, मागण्यांचा मार्ग मोकळा होत नव्हता. म्हणून कामगार संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील श्रमिक संघटनांची एक कृति समिती तयार झाली आहे. त्या कृति समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR