39.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रकांद्यावरील निर्यातशुल्क हटवण्यासाठी लासलगावी शेतक-यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

कांद्यावरील निर्यातशुल्क हटवण्यासाठी लासलगावी शेतक-यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

लासलगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ पूर्णत: रद्द करावे तसेच कांद्याला हमी भाव जाहीर करावा आदी मागण्यासाठी सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या आवारात संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकी वर चढून शोले स्टाईल आंदोलन करून कांद्याचे लिलाव बंद पाडले.

आज राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात होण्यापूर्वीच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख गोरख संत,प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर,छावा क्रांतिवीर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल गायकवाड,जिल्हाध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना केदारनाथ नवले,निवृत्ती न्याहारकर,शिवसेना ऊबाठा गटाचे केशव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतक-यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने बाजार समितीसह पोलीस प्रशासनाची धावपळ झाली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात सोमवारी सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले.यावेळी कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधींनी व कांदा उत्पादक शेतक-यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून शून्य टक्के करावे,कांद्याला २५ रुपये प्रति किलो हमीभाव देण्यात यावा,नाफेड आणि एनसीसीएफ यांनी प्रत्यक्ष बाजार समितीत कांदा लिलावात सहभाग घेऊन प्रत्यक्ष शेतक-यांमधून कांदा खरेदी करावा व कांदा उत्पादक शेतक-यांना आर्थिक दिलासा द्यावा,अशी मागणी गोरख संत यांनी उपस्थित आंदोलकांसमोर केली.

दरम्यान संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधी सोबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला.कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात पाठपुरावा करणार असून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीने मांडणार असल्याचं आश्वासन या दोन्ही नेत्यांनी या वेळी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR