लातूर : प्रतिनिधी
संयुक्त्त महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा लातूर शहर महानगरपालिकेला विसर पडला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २५ नोव्हेंबर रोजी सर्वत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांचा अभिवादन केले जात असताना लातूर शहर महानगरपालिकेतील यशवंतरावांच्या पुतळ्याचे प्रवेशद्वार मात्र कुलुपबंद होते. मनपा प्रशासनाच्या या निष्काळजीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या आवारात स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा सन २००३ साली तत्कालीन नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या कार्यकाळात बसवण्यात आला आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेत स्व. यशवंतराव चव्हाण यांचे फार मोठे योगदान आहे. त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवारात असलेल्या पुतळ्यास त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यासाठी लातूर महानगरपालिकेला वेळ नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जिल्हा केंद्र, लातूरच्या वतीने अभिवादन करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य महापालिकेच्या आवारात गेले असता यशवंतरावांच्या पुतळ्याचे प्रवेशद्वार कुलूपबंद होते. तसेच कसल्याही प्रकारची पुतळ्याची स्वच्छता केलेली नव्हती. पुतळ्यावर धुळ आणि परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य होते.
याची कल्पना देण्यासाठी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विवेक सौताडेकर यांनी महापालिकेचे आयुक्त्त यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी उचलला नाही. महापालिकेच्या आवारात असलेल्या यशवंतरांचा पुतळा लातूर महानगरपालिकेच्या आवारात असणे हे लातूरचे वैभव आहे आणि या लातूर महानगरपालिकेला त्यांचा विसर पडला याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे, सचिव प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, सदस्य, ज्येष्ठ विधीज्ञ आणि समाजवादी नेते अॅड. मनोहरराव गोमारे, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विवेक सौताडेकर तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त्त केली.