31.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeलातूरलातूर हादरले; एकास नग्न करत भर रस्त्यावर बेदम मारहाण

लातूर हादरले; एकास नग्न करत भर रस्त्यावर बेदम मारहाण

चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड आणि जालना जिल्ह्यातील मारहाणाची व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच, भाईगिरी आणि गुंडगिरी वाढत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. आता, लातूर शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मंगळवारी दुपारी पाच लोकांनी एकास नग्न करत भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने लातूर हादरले आहे. या मारहाणप्रकरणातील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबाजोगाई रोडवरील राजश्री बारजवळ मारहाणीच्या घटनेचा थरार घडला. बारमधील भांडण रस्त्यावर आलं अन पाच पक्षा अधिक तरुणांनी एका तरुणाला नग्न करत बेदम मारहाण केली. मारहाण करताना काठी, दगड आणि बेल्टचा वापर करण्यात आल्याचे व्हिडिओतून दिसून येते. त्यामुळे, लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. दिवसाढवळ्या अशा पद्धतीची हाणामारी लातूरसाठी नवीन आहे. तिथे हजर असणा-या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ स्वत:च्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर, समाज माध्यमावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले. तोपर्यंत जखमी व्यक्तीला स्थानिकांनी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि इतर माहिती गोळा केली असून मारहाण करणारे पाचजण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती आहे. ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती हरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. लातूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली करत चार जणांना ताब्यात घेतले आहे.

पाच लोकांनी एका व्यक्तीला केलेली जबर मारहाण अतिशय भयानक होती, ज्या व्यक्तीला मार लागला आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात लाथा घालून शिवीगाळ करण्यात आली होती, ही पूर्ण घटना मोबाईल कॅमे-यात कैद झाली आहे. अंबाजोगाई रोडवरील राजश्री बारमध्ये हे लोक दारु पीत बसले होते. बारमध्ये भांडण सुरु झाले. तेव्हा या भांडणात बिअरच्या बॉटल मारल्याने भांडण वाढत गेले. बिअर बारच्या बाहेर आल्यानंतरही भांडण सुरूच होतं. त्यानंतर, ही सर्वजण लातूर-अंबाजोगाई रोडवर आले आणि तेथेच ही बेदम मारहाणीची घटना घडली.

आरोपींची घटनास्थळापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड
सदरील घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच शिवाजीनगर, गांधी चौक व एमआयडीसी पोलीसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आली होती. या गुन्ह्यातील चार आरोपींना साडे आठच्या सुमारास पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची घटनास्थळ ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढत ठाण्यात आणले असून हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तसेच यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR