लातूर : प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देत गोलमध्ये रुपांतर करण्याची किमया साधणा-या लातूरच्या व्यंकटेश धनंजय केंचे याने हॉकीत मैदान मारले असून नेदरलँड येथे होणा-या युरोप टूरसाठी भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता लातुरातून हॉकीसाठी ‘चक दे लातूर’ असा आवाज घुमू लागला आहे.
चाकूर तालुक्यातील घरणी येथील व्यंकटेश केंचे याने नुकत्याच झाशी येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अनेक गोल केले होते. या बळावरच त्याची ८ ते २० जुलैदरम्यान नेदरलँड येथे होणा-या वरिष्ठ गटातील युरोप टूरसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सध्या तो बंगळुरू येथे भारतीय संघाच्या सराव शिबिरात सामील आहे. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणा-या लातूरच्या व्यंकटेशने हॉकी खेळात अनेक वेळा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अकरा वर्षांपासून तो क्रीडा प्रबोधिनीत हॉकी खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. प्रथमच भारतीय संघात त्याची निवड झाल्याने हॉकी खेळातही लातूर पॅटर्न पुढे येत आहे. त्याला माजी ऑलिम्पियन अजित लाकर, सागर कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे क्रीडा वर्तुळातून कौतुक होत आहे.
फॉरवर्ड म्हणून खेळणार
नुकतीच युरोप टूरसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, २० जणांच्या या चमूमध्ये लातूरच्या व्यंकटेशची फॉरवर्ड म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेश येथे क्लब टुर्नामेंट खेळली होती. यासह ज्युनिअर व सिनिअर गटात २० वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण व कांस्य पदके पटकावली आहेत. राज्य स्पर्धेतही त्याने अनेकवेळा मैदान गाजविले असून ७ वेळा प्रथम येण्याचा बहुमानही पटकावला आहे. ४ वेळा त्याने ज्युनिअर गटात भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभाग नोंदविला आहे.