नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीच्या नफ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीने शुक्रवारी एक निवेदन जारी केले की, ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा ७,९२५ कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १५,९५२ कोटी रुपये होता. या कालावधीत निव्वळ प्रीमियम उत्पन्न देखील मागील वर्षीच्या १.३२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १.०७ लाख कोटी रुपये राहिले.
तथापि, दुसऱ्या तिमाहीत पहिल्या वर्षाचा प्रीमियम ९,९८८ कोटी रुपये होता, जो मागील वर्षी ९,१२५ कोटी रुपये होता. तसेच एलआयसीचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत २.२२ लाख कोटी रुपये होते, जे या वर्षी २ लाख १ हजार ५८७ कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत एलआयसीने १७,४६९ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा कमावला आहे, जो गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत झालेल्या १६,६३५ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा किंचित जास्त आहे.