27.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeमहाराष्ट्रस्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी

स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी

चाकण : प्रतिनिधी
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जागतिक स्तरावरच नव्हे तर स्थानिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्याची झळ पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरालाही बसू लागल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहतूक खर्च वाढत असून, त्याचा थेट परिणाम गॅस पुरवठा, बांधकाम साहित्य, उद्योग तसेच शेतीमालाच्या बाजारभावांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ झाली असून, व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल, ढाबे, खानावळी, मिठाई दुकाने तसेच लघुउद्योग आणि छोटे व्यवसाय करणा-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा विचार करावा लागत आहे.

दरम्यान, भाजी मंडईतही या परिस्थितीचा परिणाम दिसू लागला आहे. बाजारात कांदा आणि बटाट्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असली तरी मागणी घटल्याने दरात घसरण झाली आहे. यामुळे शेतक-यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्धामुळे कांद्याच्या निर्यातीवर आलेले निर्बंध आणि एक्स्पोर्टमध्ये झालेली घट यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिर परिस्थितीमुळे कांदा निर्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, त्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचा साठा वाढत आहे. कांद्याला घाऊक बाजारात दहा रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी आधीच कमी झालेला दर आणखी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फटका शेतक-यांना बसत आहे.
शेतक-यांवर आधीच बँक कर्ज, खत-बियाणांचा खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च यांचे मोठे ओझे आहे. अशा परिस्थितीत शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही शेतक-यांना कर्जाचे हप्ते भरणेही कठीण होत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बांधकामासाठी लागणा-या स्टीलच्या दरात वाढ
बांधकाम क्षेत्रावरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बांधकामासाठी लागणा-या स्टीलच्या दरात सुमारे २ रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापा-यांकडून सांगितले जात असून, सिमेंटच्या दरातही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच घर बांधण्याचे नियोजन करणा-या नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

वाहतूक अन् उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता
चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत असून, येथे वाहननिर्मिती तसेच विविध उत्पादन उद्योग कार्यरत आहेत. जागतिक पुरवठा साखळीवर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झाल्यास कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातही आर्थिक ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR