सातारा : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा येथील जय जवान तरुण मंडळाच्या वतीने महिलांसह रायगडावर छत्रपती शिवाजी पुतळ्यास साकडे घालण्यात आले. यामध्ये मुस्लिम महिलांचा देखील समावेश होता.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू असताना मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाने देखील वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसत आरक्षणाची तीव्रता सरकारला दाखवण्याची भूमिका बजावली.
जय जवान तरुण मंडळाच्या वतीने येथील ५० महिला व दहा पुरुषांनी रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत सकल मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे ही मागणी करत महाराजांच्या पुतळ्यासमोर साकडे घातले.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिलांनी डोक्यावर फेटा व गळ्यात भगवे उपरणे घातले. यावेळी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मुंबईच्या आंदोलनात सर्व महिला सहभागी होणार असा निर्धार करण्यात आला.