नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. रामलल्लाचा अभिषेक २२ जानेवारी रोजी निर्माणाधीन मंदिरात होणार आहे, ज्यामध्ये देशभरातून आणि जगभरातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. परंतु याआधीहीच राम मंदिर उभारणीच्या नावाखाली देणगी गोळा करण्याच्या फसवणुकीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. विश्व हिंदू परिषदेने (विहिप) अशा फसवणुकीचा पर्दाफाश केला असून देणगी देणाऱ्या लोकांनाही याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राम मंदिराच्या नावावर लूट सुरु असल्याचे समोर आले आहे.
विहिपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दोन स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले आहेत. श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या मागणाऱ्या ‘क्यूआर’ कोडचे स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत. त्यांनी निवीदानात म्हटले आहे की, “सावधान..!!, काही लोक श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या नावाने बनावट आयडी बनवून पैशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृह मंत्रालय, दिल्ली पोलीस आणि यूपी पोलिसांनी अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. श्री राम तीर्थ यांनी कोणत्याही संस्थेला असे कार्य करण्यास अधिकृत केलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी बनावट माध्यमातून देणगी गोळा करण्यासाठी क्यूआर कोड जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा क्यूआर कोड फेसबुकवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या, उत्तर प्रदेशचे पृष्ठ म्हणून तयार केला गेला आणि प्रसारित केला गेला आहे. विहिंपने याप्रकरणी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत केंद्रीय गृह मंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.