मुंबई : नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुख हिने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक अंतिम सामन्यात ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमधील सुरूवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. त्यानंतर आज, सोमवारी रॅपिड राऊंड्स खेळवण्यात आल्या. त्यात एकात दोघींनी बरोबरी साधली. पण दुस-या राऊंडमध्ये दिव्याने हम्पीला माघार घेण्यात भाग पाडले. महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिलीवहिली भारतीय ठरली. तिच्या या विजयानंतर, राज ठाकरे यांनी खास शैलीत तिचे कौतुक केले.
अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवले. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आले असते हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचे मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा… महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचे नाव मोठे करायला वापरले जाते, तेंव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन… अशा शब्दांत राज ठाकरे यांनी दिव्या देशमुखची स्तुती केली.
सुप्रिया सुळेंनीही केले अभिनंदन
जॉर्जिया येथे पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिने विजेतेपद पटकावले. भारताचीच कोनेरु हंपी उपविजेती ठरली आहे. दिव्या १९ वर्षांची असून ती नागपूरची रहिवासी आहे. दिव्याचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असे ट्विट त्यांनी केले.